Shabari Gharkul Yojana : आदिवासी उपयोजनेंतर्गत जळगाव महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत. जे कुडा – मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांची स्वत:ची जागा आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्याकडून पक्के घर मंजूर केले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिकेकडे अर्ज करावा. असे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांसाठी २ लाख ५० हजार रूपये अनुदान देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा असावा, लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे किवा लाभार्थी बेघर असावा, घरकूल बांधकामाचे चटई क्षेत्र हे २६९ चौरस फुट एवढे राहील. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उपन्न मर्यादा ३ लाखांपर्यंत असावी.
लाभासाठी अर्जदाराकडे अनुसूचित जमातीचा दाखला, स्वतःच्या नावाने पक्के घर नसल्याबाबत दाखला, महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षापासून रहिवासी असावा, घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतानेला नसावा, वय वर्ष १८ पूर्ण असावे, स्वत:च्या नावाने बॅंक खाते असावे.
अर्जासोबत अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र,अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा, उत्पनाचा दाखला (तहसीलदार यांचा), शिधापत्रिका, आधारकार्ड, एक रद्द केलेला धनादेश किंवा बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत वरील प्रमाणे कागदपत्र असलेल्या लाभार्थ्यांनी शबरी घरकुल नगरपरिषद, महानगरपालिका येथे अर्ज करावेत. असे आवाहन पवार यांनी केले आहे.