जळगाव पोलिसांनी लढवली शक्कल, 7 वर्षे गुंगारा देणाऱ्या वाळूमाफियाला ठोकल्या बेड्या

जळगाव : काही गुन्हेगार फार हुशार असतात. गुन्हा केल्यानंतर ते सहजासहजी पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. मात्र, पोलीस शेवटी पोलीस असतात, एखाद्या गुन्हेगाराचा मार्ग काढण्याचा निश्चय जर त्यांनी केला तर त्याला पकडल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. जळगावमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

जळगाव पोलिसांनी शक्कल लढवून ७ वर्षांपासून फरार असलेल्या वाळूमाफिया मुकुंद बलविंदरसिंह ठाकूर (५७, रा. बळिराम पेठ) याला अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वेटरला दार ठोठवायला लावून दार उघडताच ठाकूरवर झडप टाकून ताब्यात घेतले. नाशिक रोड येथील बिटको चौकातील एका हॉटेलमध्ये हा संशयित आला असता, पोलिसांच्या जाळ्यात अडकला. न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलीस सूत्रानुसार, शिवाजीनगर उड्डाणपुलावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरद्वारे पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये वाहनचालक-मालक आणि वाळू ठेकेदाराविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

तब्बल दोन वर्षे मुकुंद ठाकूर यास पोलिस पकडू शकले नाहीत. गुन्हेशाखेने मध्य प्रदेशात सापळा रचला असता तेथूनही तो निसटला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध जिल्‍हा पेठ पेालिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल असतानाच मुकुंद ठाकूर वनजमिनीचे सौदे करून पैसा उकळत राहिला. शहरातील मोठमोठी मंडळी, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर आणि उच्च शिक्षित मंडळींना ठाकूर गँगने सरकारी जमिनी विकून बक्कळ पैसा कमावला.

पाच-सात वर्षांपासून रेकॉर्डवरील फरारी संशयित मुकुंद ठाकूर याच्या शोधार्थ जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हेशाखेला आदेशित केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील यांना मुकुंद ठाकूरची गोपनीय माहिती हाती लागली.

नाशिक रोड येथील बिटको चौकातील एका हॉटेलमध्ये मुकुंद ठाकूर असल्याचे तांत्रिक विश्लेषकांनी पॉइंट आउट केल्यानंतर अश्रफ शेख, दीपक पाटील, दीपक गुंजाळ यांच्या पथकाने त्याला अलगद हॉटेल गाठले

वेटरला दार ठोठवायला लावून दार उघडताच ठाकूरवर झडप टाकून ताब्यात घेण्यात आल्याचे पथकाने सांगितले. संशयितास जिल्‍हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने संशयितास १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत दिली.