तरुण भारत लाईव्ह न्युज गाझियाबाद : ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून हिंदू मुला-मुलींचे धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार शाहनवाज बद्दी याच्या मोबाईल फोनमध्ये ३० पाकिस्तानी नंबर आढळून आलेत. तो गेमिंग अॅपद्वारे देशपातळीवर धर्मांतरणाचे रॅकेट चालवायचा. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
शाहनवाज हा मूळचा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्राचा रहिवासी असून, तो एकाचवेळी सहा ई-मेल हाताळायचा. यातील एका ई-मेलमध्ये पाकिस्तानातून मेसेज यायचे, अशी माहिती गाझियाबादच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांनी त्याच्याजवळून दोन मोबाईल फोन आणि सीपीयू जप्त केला असून, त्याची तपासणी केली जात असल्याचे अधिकारी म्हणाला. ठाण्यात अटक करण्यात आल्यानंतर शाहनवाजला ट्रान्झिट रिमांडवर उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथे आणण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. तो पाकिस्तानातील कोणत्या लोकांच्या संपर्कात होता आणि आतापर्यंत त्यांच्यात कोणते व्यवहार झाले, याचा शोध सायबर विभागाकडून घेतला जात आहे. या पाकी फोन नंबर्समधून काही आक्षेपार्ह आणि राष्ट्रविरोधी कृत्य आढळून आल्यास त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. शाहनवाज सध्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद असून, अधिक चौकशी करण्यासाठी पोलिस त्याचा ताबा मागणार असल्याचे ते म्हणाले.
गाझियाबादच्या पोलिसांनी रविवारी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथून शाहनवाज खानला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला होता.