शरद पवारांच्या घरात शिजतेय राजकीय खिचडी ? भुजबळांपाठोपाठ आता सुनेत्रा पवार…

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोमवारी छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली. त्यानंतर मंगळवारी शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यावेळी शरद पवार त्याच ठिकाणी होते. परंतु सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली आणि काय चर्चा झाली, ही माहिती मिळू शकली नाही. मात्र, दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणाची दिशा पुन्हा शरद पवार यांच्याकडे सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणुकी मैदानात होत्या. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवणुकीत उतरल्या होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंबिय अजित पवार यांच्या विरोधात गेले होते.

अजित पवार यांचे सख्ख्ये बंधूसुद्धा त्यांच्या विरोधात प्रचारात होते. या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्येच आरोप-प्रत्यारोप झाले होते. निवडणूक निकालात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. या निवडणुकीनंतर प्रथमच सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मंगळवारी गेल्या. त्यावेळी शरद पवार मोदीबागेतच होते. सुमारे तासभर सुनेत्रा पवार त्या ठिकाणी होत्या. परंतु त्यांनी कोणाची भेट घेतली ? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली का? ही माहिती मिळाली नाही.

कालच शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगितले होते. भुजबळ म्हणाले की, शरद पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यावर चर्चा झाली आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्याचे मान्य केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यात राजकारण करण्यासारखे काही नाही, असेही भुजबळ म्हणाले.