मागच्या पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे नाव कायम चर्चेत राहिलंय. आजही शरद पवारांचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्थान आहे. पण २ जुलैच्या रविवारी अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार आपले महाराष्ट्राच्या राजकारणातील योग्य स्थान शोधत आहेत. शरद पवारांनी आपल्या पाच दशकाच्या राजकीय कारकीर्दीत कित्येकदा राजकीय भूमिका बदलल्या. त्यामुळेच त्यांना राजकारणात कायमच एक अविश्वासू नेता मानण्यात आलं. पण अजित पवारांच्या बंडानंतर अद्याप तरी ते आपणं अजित पवारांसोबत समझौता करणार नाहीत या भूमिकेवर ठाम आहेत. ठाम आहेत म्हणण्यापेक्षा अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताच समझौता होऊ शकला नाही, असं म्हणावं लागेल. त्यामुळे शरद पवार सध्यातरी ‘एकला चलो रे’च्याच धोरणावर ठाम आहेत असं वाटतंय. पण ते शरद पवार आहेत. ते कधी आपली भूमिका बदलतील ते स्वत:ही सांगू शकत नाहीत. शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत न जाण्याचा निर्णयावर ठाम राहिल्यास त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल? जर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्याकडे गेल्यास शरद पवार नवीन पक्ष काढतील की काँग्रेसमध्ये जातील? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
राष्ट्रवादीकडे ५४ आमदारांचे संख्याबळ आहे. म्हणजेच वेगळा गट निर्माण करण्यासाठी किंवा अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी ३६ आमदारांचे पाठबळ असणं गरजेचे आहे. कालच शरद पवार गटाने अजित पवार गटातील ४१ आमदारांना अपात्रतेसाठी नोटिस पाठवली. यावरुन हे स्पष्ट झाले की, अजित पवार गटाकडे सध्या राष्ट्रवादीचे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत. तर शरद पवार गटाकडे आता केवळ १२ आमदार शिल्लक राहिलेत. तर नवाब मलिक हे सध्या कोणत्याच गटात नाहीत. त्यामुळे आमदारांचे बहुमत अजित पवार यांच्याकडेच आहे.
अशीच परिस्थिती शिवसेनेची होती. शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना होता. त्यासोबतच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या संघटनेलाही आपल्या बाजूने वळवले. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला. शिवसेना एक संघटना असलेला पक्ष असल्यामुळे पक्षावर दावा करताना पक्ष संघटनाही तेवढीच महत्वाची होती. पण राष्ट्रवादीमध्ये परिस्थिती उलटी आहे.
राष्ट्रवादीमध्ये ‘नेता जिकडे कार्यकर्ता तिकडे’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पक्षसंघटनेला एवढ महत्व नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी कोणाची हे ठरवताना फक्त लोकप्रतिनीधींच्याच संख्येचा विचार करावा लागेल आणि आज ती संख्या अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर अजित पवारांचा दावा मजबूत आहे. मग प्रश्न निर्माण होतो की राष्ट्रवादी पक्ष हातातून गेल्यावर शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासारखे गटप्रमुख होणार की आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करणार?
पहिली शक्यता आहे, आपला वेगळा पक्ष काढणं. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना करुन २५ वर्ष झाली. पण शरद पवारांना स्वबळावर ७० पेक्षा जास्त आमदार कधी निवडून आणता आले नाही. समजा, आज शरद पवारांनी उतारवयात नवा पक्ष स्थापन करण्याचा घाट घातलाच तर त्यांना किती यश येईल. याची साशंकताच आहे. राष्ट्रवादी स्थापन केली त्यावेळी त्यांच्याकडे आर.आर.पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे कित्येक नेते होते. सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा होता. स्वत: शरद पवारही सक्रीय राजकारणात होते. पण आज परिस्थिती उलट आहे. शरद पवारांकडे जयंत पाटील सोडले तर कोणी नेता नाही. नविन पक्ष जनतेसमोर आणण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. तसेच शरद पवारांच वय पाहता ते नविन पक्ष काढणार का? हा मोठा प्रश्न आहे.
शरद पवार नविन पक्ष स्थापन करण्याच्या स्थितीत नसतील तर त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे काँग्रेस पक्षात आपला गट विलीन करणं. शरद पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधूनच केली. त्यानंतर सत्तरच्या दशकात शरद पवारांनी काँग्रेस सोडली. पुन्हा शरद पवार राजीव गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर सोनिया गांधीच्या विदेशी असण्याच्या मुद्यावरुन पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला.
राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतरही शरद पवारांनी काँग्रेससोबत आघाडी करत १५ वर्ष महाराष्ट्राची सत्ता उपभोगली. त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस काही नवीन नाही. पण काँग्रेसला शरद पवार जवळचे वाटतात का? हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये शरद पवार आल्यास महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचे काय होणार? शरद पवार त्यांना वरचढ ठरणार नाहीत का? हा प्रश्न निर्माण होतो. आणि हा ही प्रश्न आहे की, शरद पवारांना काँग्रेसकडून काय मिळणार?
काही राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसकडून शरद पवारांना सन्मानपूर्वक राजकारणातून निवृत्ती मिळू शकते आणि सुप्रिया सुळेंचे राजकीय भविष्य वाचू शकते. शरद पवारांनी जर सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्यास काँग्रेसला शरद पवार गटाला आपल्यात सामावून घेण्यास काही अडचण येणार नाही. काँग्रेसला दोन तालुक्यात प्रभाव असलेले नेते जयंत पाटील मिळतील. पण जयंत पाटलांना काँग्रेसाला काही द्यायची गरज पडणार नाही. त्यासोबतच संपूर्ण शरद पवार गटाचे पुण्य सुप्रिया सुळेंना मिळेल. आज महाराष्ट्रातून दिल्ली दरबारी काँग्रेसचा कोणताही मोठा नेता नाहिये. त्यामुळे दिल्लीच्या दरबारी राजकारणात रस असलेल्या सुप्रिया सुळेंना ही जागा मिळू शकते. त्यासोबतच त्यांचे राजकीय भविष्यही सुरक्षित होईल. त्यामुळे दोघांसाठीही हा फायद्याचा सौदा ठरेल. त्यामुळे भविष्यात शरद पवार तिसऱ्यांदा काँग्रेसकडे जातात का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
– श्रेयश खरात