Sharad Pawar : मराठा की ओबीसी… व्हायरल होणाऱ्या दाखल्यामागचं सत्य काय?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं खोटं सर्टिफिकेट व्हायरल होत आहे. याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. शरद पवारांचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी केला आहे.

विकास पासलकर यांनी शरद पवारांचा शाळा सोडतानाचा दाखला समोर आणला आहे. या प्रमाणपत्रावर ‘मराठा’ असा उल्लेख दिसत आहे. ओबीसी सर्टिफिकेट पवारांनी घेतललं नाही, असं म्हणत पासलकरांनी शरद पवारांचा शाळा सोडतानाचा दाखला सादर केला आहे.

शरद पवार यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं नाही. इतक्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी काही लोकांकडून विटॅमिन पुरवलं जात असणार आहे. शरद पवारांनी जेथे जेथे शिक्षण घेतले त्या सर्टिफिकेटवर त्यांची जात मराठा म्हणूनच आहे.

नागपूर सेंटरकडून हा खोडसाळपणा घडतोय. ज्यांची कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत पासलकर यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केलं. हा सर्व बालिशपणा सुरु आहे. व्हायरल होत असलेलं सर्टिफिकेट इंग्लिशमध्ये आहे. खोडसाळपणा करण्यासाठी असे प्रकार होत आहेत, असं म्हणत त्यांनी टीका केली. भाजपनेही यावर उत्तर दिलंय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही कशाला खोटी प्रमाणपत्र व्हायरल करु, ती राष्ट्रवादीची परंपरा आहे, आमची नाही. आम्ही राष्ट्रीय कामामध्ये गुंतलो आहोत.