बारामती : अजित पवारांसोबत पुण्यात झालेल्या बैठकीच्या मुद्यावर महाविकास आघाडीमध्ये कोणताही गोंधळ नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. महाविकास आघाडी एकजूट आहे आणि मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचे यशस्वी आयोजन केले जाईल, असे शरद पवार यांनी येथे पत्रकारांसोबत चर्चा करताना सांगितले.
अजित पवार यांनी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे सरकारमध्ये 2 जुलै रोजी सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांचा हा बारामतीचा पहिलाच दौरा होता. काका आणि पुतण्यातील बैठकीमुळे राजकीय क्षेत्रात गोंधळ उडाला. तो दूर करावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली होती.
महाविकास आघाडीच्या भागीदारांमध्ये कोणताही गोंधळ नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि इंडियाची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणारी बैठक यशस्वी पार पडेल, असा विश्वास व्यक्त करताना, वारंवार तेच प्रश्न विचारून आघाडीत गोंधळ निर्माण करू नका, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मी ‘इंडिया’ची बैठक मुंबईत आयोजित करण्याची जबाबदारी घेतली आहे, असे शरद पवार म्हणाले.