मुंबई : अजित पवार हे आमचेचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फुट नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बारामतीतून कोल्हापूरच्या सभेला निघण्यापूर्वी पवारांनी हे वक्तव्य केले आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे देखील पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. शरद पवार भाजपसोबत आहेत की इंडिया आघाडीसोबत, या संभ्रमातही आणखीनच भर पडली आहे. यापूर्वी अजित पवार आमचे नेते आहेत, पक्षात फूट पडलेली नाही असे विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.
उध्दव ठाकरे गटाचे नेते म्हणाले, आम्ही संभ्रमात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केले असावे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय. मला जाहीरपणे काही वक्तव्य करता येणार नाही. मात्र आमच्यामध्ये, शिवसेनेत संभ्रम निर्माण होतो. स्पष्ट भूमिका समोर यायला पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते. जे लोक राष्ट्रवादीत गद्दारी करुन भाजपसोबत जातात आणि हे त्यांना नेता मानतात, असे अंबादास दानवेंनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी केली कुरघोडी
शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करत आहोत. भुजबळ, मुंडे आणि इतर नेते देखील तुमचे कार्यकर्ते आहेत. अजित पवार तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत. शरद पवार आमचेच आहेत. आम्ही देखील त्यांना जाऊन भेटलो आहोत. पक्षात फूट पडली नाही असे ते म्हणत आहेत, मग आता त्यांनी आमच्या या कृतीला समर्थन द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.
बच्चू कडू यांची खोचक प्रतिक्रिया
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढंच मी सांगेन”, असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे. “एकीकडे ते म्हणतात फूट नाही, दुसरीकडे ते नोटीस देतात. हा सगळा मोठा खेळ आहे. हा मोठा गेम असू शकतो. एकतर आघाडीत राहून शरद पवार लढतील आणि युतीत राहून अजित पवार लढतील. नंतर दोन्ही नद्यांचा संगम होऊन पुन्हा आपलाच एक सागर तयार करू शकतील”, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. “हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत”, अशी खोचक टिप्पणी बच्चू कडूंनी यावेळी केली.
भाजप नेत्याची सुप्रिया सुळेंना मंत्रीपदासाठी शुभेच्छा
दरम्यान भाजपचे नेते नितेश राणे यांनी थेट सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका मराठी सिनेमाचा फेमस डायलॉग आहे कुणी घर देता का घर, तशीच अवस्था उद्धव ठाकरे आणि उबाठाची झालेली आहे. आम्ही पहिल्यापासून बोलतोय शिवसेने उध्दव बाळासाहेब ठाकरे ही मविआची वाय झेड टीम आहे. मोठ्या तावातावाने संजय राजाराम राऊत बोलतात, विरोधकाची आघाडी 2024 ला सत्तेत येणार, अरे 24 दिवस एकत्र राहून दाखवा असेही भाजपचे नेते नितेश राणे म्हणाले.
राणे पुढे बोलताना म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सुप्रिया ताईंनी सांगितले आणि आता पवार साहेबानी देखील सांगितले अजित दादा आमचे नेते आहेत. आम्ही जे वारंवार बोलतो महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून मोदींसाहेबांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात जनतेची सेवा करतोय यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. 2024 ला पण मोदी साहेब तसेच चंद्रयान 3 ने जी यशस्वी लँडिंग केली तसेच भारतीय जनेतच्या मनात मोदी यशस्वी लँडिंग करतील. सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्री पदाच्या शुभेच्छा देतो, बारामतीला अजून एक लाल दिवा मिळो अशी मी माझ्या रामेश्वरकडे प्रार्थना करतो असेही राणे म्हणाले आहेत.
उदय सामंत म्हणाले, संभ्रमात राहू नका
पवारांच्या विधानानंतर संभ्रमात राहायची आवश्यकता नाही. अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. अजित दादांकडून कुठलाही संभ्रम नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने अजित दादांचे स्वागत होत आहे ते न भूतो न भविष्यती आहे. त्याच्यावर जर प्रतिक्रिया अशी असेल की अजित दादा नेते आहेत. तर मला वाटतं की, काही लोकांचं पाऊल NDA कडे येत आहे का, अशी शंका निर्माण होत आहे. INDIA आघाडी किती एकसंध राहते हे पाहणं आवश्यक आहे, हा खरा संभ्रम त्यांच्यासाठी आहे, असा दावा उदय सामंत यांनी केला.