शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सामनामधून टीका; वाचा काय म्हटलयं

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. गेल्या ४३ दिवसांत अजित पवारांनी ४ वेळा शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चा आणि महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होत आहे. शिवसेनेनंही या भेटीवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत या भेटीगाठी म्हणजे गंमत-जंमत असल्याचं म्हटलंय. मात्र, अशा भेटींमुळे संभ्रम वाढून शंकेला बळ मिळत असल्याचंही शिवसेनेनं सामना मुखपत्रातून म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल. पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही. असे म्हटलं आहे.

अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. त्यात अजित पवार हे अधूनमधून शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळ्यांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला, पण त्यासाठी दूर सातऱ्यात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही. शिंदे गटाने त्यांच्या नेत्यास तत्काळ मुंबई-ठाण्यातील इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले पाहिजेत. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सातऱ्यात जाऊन गावठी उपचार, जडीबुटी, जादूटोणा, बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार करून घेणे योग्य नाही. आरोग्य हीच संपत्ती आहे व त्या संपत्तीचे रक्षण खोक्यांनी होत नाही, अशी टीकाही करण्यात आली आहे.