आधी पार्थ पवारांना निवडून आणा, शरद पवार गटाचं ओपन चॅलेंज

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करून शिरुरमध्ये अजित पवार गटाचा उमेदवार निवडून आणणार असे आव्हान दिले आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे.

अजित पवारांनी हे आव्हान दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट अजित पवारांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणून दाखवण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे. अजित पवारांनी पार्थ पवार यांना पुन्हा मावळमध्ये उभा करावे आणि यावेळेस तरी निवडून आणून दाखवावे मग बाकीच्या गप्पा माराव्यात, असे थेट ओपन चॅलेंजच लवांडे यांनी अजित पवारांना दिले आहे.

कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा ( शरद पवार गट ) शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु झाला आहे. या मोर्चादरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड येथे सभा पार पाडली यावेळी बोलताना विकास लवांडे म्हणाले की, “अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजून तुमचा उमेदवार फिक्स झाला नाही. अजित पवार उभा राहण्यासाठी याला त्याला काड्या करत आहेत.

अजितदादा तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील यांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे विजयी झाले तर आता तुम्ही दिलीप वळसे पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करा, मग आपण पाहूच काय होतंय. असेल हिम्मत तर लढाच”, असे आव्हान त्यांनी दिले आहे.