अजित पवारांच्या निर्णयाचे शरद पवारांकडून कौतूक; वाचा सविस्तर

मुंबई : मराठा आरक्षणच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मराठा समाजाने राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यात बारामतीत अजित पवारांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. माळेगाव साखर कारखानाच्या गळीप हंगामाची सुरूवात आजपासून होतेय. याठिकाणी मोळीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु मोळीपूजनाला अजित पवारांनी येऊ नये असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला.

मराठा आंदोलकांनी अजित पवारांना केलेला विरोध पाहता परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोळीपूजनाला जाणे टाळले. शेतकऱ्यांच्या हातून मोळीपूजन करा अशा सूचना अजितदादांनी कारखाना प्रशासनाला दिल्या. अजित पवारांच्या निर्णयाचे समर्थन करतांना शरद पवार म्हणाले की, लोकांच्या मराठा आरक्षणाबाबत काही भावना असतील तर अशावेळी तिथे संघर्ष टाळणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. माझ्या मते, अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे, असे ते म्हणाले.

मराठा समाज म्हणून आमच्या वाट्याला निराशाच येते. १ लाख ६५ हजार मताधिक्यामध्ये मराठा समाजाचे योगदान नाही का? आम्ही अजित पवारांना मतदान केले. मग आमचे चुकतंय कुठे? सगळ्याच नेत्यांमागे समाज उभा राहतो. मतदानात आमचा वापर करतात. आम्हाला ओबीसीतून ५० टक्क्यातून आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. मराठा समाजाला भूलथापा देऊन वेळ काढू अशी भूमिका असेल तर समाज आता जागरुक झाला आहे. कोणत्याही नेत्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही असंही मराठा आंदोलकांनी स्पष्ट सांगितले आहे.