शरद पवार अदानींच्या गुजरातमधील घरी दाखल, चर्चांना पुन्हा उधाण!

अहमदाबाद : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी दाखल झाल्याचं वृत्त आहे. शरद पवार हे गौतम अदानी यांच्या घरी पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार हे नेमक्या कोणत्या कारणासाठी गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये, त्यांच्या घरी जावून भेट घेत आहेत, हा प्रश्न असला तरी शरद पवार आणि अदानी यांच्या अहमदाबाद भेटीमागील कारण हे वेगळंच असल्याचंही समोर येत आहे.

शरद पवार आणि गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये, अदानी यांच्याच घरी भेट झाली, पण एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार हे गौतम अदानी यांच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा पवार या देखील असल्याने हे एक कौटुंबिक भेट असू शकते, असं सांगण्यात येत आहे.

या आधी गौतम अदानी आणि शरद पवार यांची 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती, शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात 2 तास चर्चा झाली होती. गौतम अदानी हे हिंडनबर्ग प्रकरणात चर्चेत आले होते, तेव्हा ही भेट झाली होती. यानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची दुसरी भेट 2 जून 2023 रोजी झाली होती, यात त्यांची अर्धातास चर्चा झाली.

गुजरातमध्ये मुक्कामी थांबणार

दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीत सहभागी आहे. याच आघाडीतील काँग्रेसकडून विशेषत: राहुल गांधींकडून सातत्यानं अदानींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप करत टार्गेट केलं जात आहे. त्यात शरद पवार आणि गौतम अदानी यांचे देखील मित्रत्वाचे संबंध आहेत, त्यामुळं हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चा सुरु होतात. आज अदानींच्या घरी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवारांचा मुक्कामही होणार असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.