सोलापूर । राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धुमधाम सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. बड्या नेत्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडली असून भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली. या मतदारसंघात आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील अशी हायहोल्टेज लढत होण्याची शक्यता आहे.
परंतु यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. नुकतीच विठ्ठल कारखान्यावर सभासद शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत अभिजित पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला.
त्यामुळे माढ्यात भाजपाची ताकत वाढली आहे. दरम्यान, अभिजित पाटील यांच्या विठ्ठल कारखान्यावर थकीत कर्जापोटी कारवाई झाली. यानंतर अभिजित पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडत भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून देखील अभिजित पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं.