मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील काही खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्याला विरोध म्हणून शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत जंतरमंतर येथे इंडिया आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह शरद पवारसुद्धा मंचावर उपस्थित होते. मात्र त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
राजकारणात पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची नावे घेतली जातात. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सूचवले. त्यानंतर शरद पवार बैठकीतून माध्यमांना बाईट न देताच तिथून निघून गेले. त्यामुळे त्यांच्या नाराजीबाबतच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या.
मंचावर नेमकं काय घडलं?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी विरोधकांची फळी इंडिया आघाडी म्हणून एकत्र आली आहे. याच इंडिया आघाडीने शुक्रवारी जंतरमंतर येथे लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील काही खासदारांच्या झालेल्या निलंबन प्रकरणी जाहीर सभा घेतली. यावेळी उबाठा गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता. काँग्रेसच्या इतर नेत्यांसह शरद पवार मात्र मंचावर शेवटपर्यंत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या रुपरेशेप्रमाणे मंचावर उपस्थित मान्यवर एक-एक करत आपले विचार व्यक्त करत होते. एकाचे भाषण संपले की निवेदक पुढच्या वक्त्याचे नाव घेऊन त्यांना बोलवत होता. असे शरद पवारांच्या भाषणापर्यंत झाले. पवारांच्या भाषणानंतर राहुल गांधी बोलायला येणार होते. पवारांचे भाषण संपताच समोरून राहुल गांधींच्या नावाचा जयघोष सुरु झाला. याचवेळी शरद पवारांच्या शेजारी असलेल्या व्सक्तीने त्यांना थांबवून ‘तुम्ही राहुल गांधींना भाषण करण्यासाठी बोलवा’ असे त्यांना सांगितल्याचे दिसले. पवारांच्या हावभावावरून त्यांना याची पूर्वकल्पना नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. एकंदरीत इंडिया आघाडीच्या मंचावर शरद पवारांचा अपमान झाल्याचे उघडकीस होत आहे.