मुंबई : देशात लोकसभा २०२४ निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा पराभव करण्यासाठी देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. मात्र इंडिया आघाडीत अधूनमधून नाराजीचे फटाके फुटत असतात. नितीशकुमार वेगळे झाले. ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला. आता शरद पवारांनी इंडिया आघाडीतल्या मतभेदांवर भाष्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद आहेत. मात्र ते मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळे एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय. इंडिया आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यपूर्ती सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही.
राष्ट्रातील तीन जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झाला नाही उद्या याबाबत बैठक होणार आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख श्वेतपत्रिकेत आला होता. तेव्हाच वाटलं होतं की अशोक चव्हाण वेगळा निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर जे व्हायचं ते झालं, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर शरद पवारांनी भाष्य केलंय.
इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसच्या वतीनं मल्लिकार्जून खरगे सहभागी होतात. महाराष्ट्रातील जागावाटपच्या चर्चेत मी नसतो. जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत एकत्र बसून चर्चा करतात. उद्या त्यांची बैठक होत आहे,अस शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात मविआची बैठक उद्याच आहे, चर्चा होईल दोन तीन दिवसात काय होतू ते पाहू, असं त्यांनी म्हटलं.