वाघ हा वाघ असतो, कधीच म्हातारा होत नसतो, शरद पवारांचे जळगावात जंगी स्वागत

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (दि.५) जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी शरद पवारांचे जळगाव शहरात आगमन झालं आहे. दरम्यान, सभेआधीच शरद पवारांचं शहरात भव्य दिव्य स्वागत करत शरद पवार गटातर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. शहरात जागोजागी मोठंमोठे बॅनर्स लागले असून वाघ हा वाघ असतो कधीच म्हातारा होत नसतो… असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची ही पहिली सभा आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या स्वागतादरम्यान जळगावात राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार गट) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास शरद पवारांचे अजिंठा चौफुलीवर भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीवरुन पुष्पवृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी ढोलताशा पथके देखील होती.