शरद पवार म्हणाले होते, राजकारणात संधी, खुर्ची मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत शरद पवार विरुध्द अजित पवार असा सामना रंगला आहे. त्यातच अजित पवारांनी शरद पवारांना रिटायर्ड होण्याचा सल्ला दिल्याने शरद पवारही प्रतिहल्ले चढवत आहेत. अशातच शरद पवारांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात तरूण कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतांना ते म्हणाले होते की, “राजकारणात संधी मिळत नसते ती तुम्हाला हिसकावून घ्यावी लागते. नाहीतर आमच्यासारखे माणसं उठत नसतात” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.

शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते की, “मी तुम्हाला सत्य सांगतो, राजकारणात संधी येत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. तरूण मुलांनासुद्धा संधी मिळत नसते. तुम्हाला लक्ष ठेवून ती खुर्ची आपल्याकडे खेचून घ्यावी लागते. नाहीतर आम्ही उठत नसतो, त्याच तयारीने तुम्ही राहणे अत्यंत गरजेचे आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो” असं पवार म्हणाले होते.

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये मोठं बंड केलं. बंडानंतर त्यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, “तुम्ही किती दिवस त्या पदाला धरून राहणार, आम्हाला पण संधी द्यायला पाहिजे. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिलाच कशाला, तुमचं वय झालं आता तुम्ही थांबायला पाहिजे, इतरांना संधी द्यायला पाहिजे” असं अजित पवार कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार यांचा राजकारणातील आणि सत्तेतील खुर्चीबद्दलचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.