मुंबई : महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवीचा मुद्दा लावून धरला आहे. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना या विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करणार्यांना सुनावताना पवारांनी, काही जण असे मुद्दे उपस्थित करत आहेत ज्यावर नंतरही बोलणं होऊ शकतं. सध्या देशात यापेक्षा फार महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर राजकीय क्षेत्रातून भाष्य होणं गरजेचं असल्याचे पवार म्हणाले.
काही आठवड्यांपूर्वीच गुजरात हाय कोर्टाने मोदींच्या डिग्री प्रकरणावरुन अरविंद केजरीवाल यांना दणका दिला होता. कोर्टाने केंद्रीय सूचना आयोगाला २०१६ साली देण्यात आलेला आदेश रद्द केला होता. या आदेशामध्ये मोदींच्या डिग्रीसंदर्भातील माहिती केजरीवाल यांनी मागितली होती. मात्र ही माहिती उपलब्ध करुन देण्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये केजरीवाल यांच्याविरोधात कोर्टाने निर्णय दिला. उद्धव ठाकरेंनी मोदींच्या डिग्री प्रकरणाबद्दल बोलताना खोचक टोला लगावला होता. असं कोणतं कॉलेज आहे जे पंतप्रधान मोदींनी आमच्याकडे शिक्षण घेतल्याचं गर्वाने सांगण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीय? असा खोचक प्रश्न उद्धव यांनी विचारला होता.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पत्रकरांनी याच विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था आणि महागाईवर सध्या चर्चा होणं आवश्यक आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यापेक्षा या अशा मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. या अशा मुद्द्यांवर र्चा होऊ शकते. मात्र नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील मुद्दे गरज नसताना उपस्थित केले जात आहे. आज कॉलेजच्या डिग्रीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? हे काय राजकीय मुद्दे आहेत का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.