मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्पोट केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा धुराळा उडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का करण्यात आले नाही, यावर त्यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज नेते आहेत, ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची गळ घातली, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, अशी विचारणा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना केली होती.
शरद पवारांनी असे म्हटले असतानाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव दिले होते. यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावे लागेल असे शरद पवार म्हणाले होते, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह शरद पवारांनी धरला होता. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे तुम्ही जे नाव सूचवत आहात, त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही, असे शरद पवार म्हणाले होते, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
अरविंद सावंत यांचा यु-टर्न
शरद पवार यांनी रिक्षावाला शब्द वापरला का, याबाबत अरविंद सावंत यांना छेडल्यानंतर त्यावर बोलताना, ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत अशीच चर्चा झाली होती. ते रिक्षावाले आहेत. त्यामुळे आम्ही तो शब्द वापरतो. हा शब्द शरद पवार यांनी वापरला नाही. शरद पवार असे शब्द वापरत नाहीत. ही शिवसैनिकांची भाषा आहे, असे सांगत अरविंद सावंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.