मराठा समाजास आरक्षण कसं मिळेल? शरद पवार यांनी सांगितला ‘हा’ मार्ग

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. ओबीसींच्या कोट्यातून आणखी एक वाटेकरी देणं हा ओबीसी गरीब समाजावर अन्याय होईल असं काहींचं म्हणणं आहे आणि ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अशात मग मराठा आरक्षण जर द्यायचं असेल तर काय करता येईल तो पर्यायही शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जालना येथील घटनेनंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण पुन्हा पेटले आहे. यावर शरद पवार यांनी केंद्र सरकारला मार्ग सांगितला आहे.

ओबीसींच्या कोट्यातून आणखी वाटेकरी करणं हे सुद्धा ओबीसी गरीब लोकांवर अन्याय होईल, असं काही लोकांच म्हणणं आहे. हे एकदम दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्याला पर्याय हा आहे की, आज जी 50 टक्क्यांची अट आहे, यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची वाढ करण्यासंदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली, तर हे प्रश्न सुटतील, असे शरद पवार म्हणाले आहेत. ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद नको, त्यांच्यात वाद करायचा कुणी प्रयत्न करत असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा नाही, असा सज्जड दमही शरद पवार यांनी दिला आहे.