---Advertisement---
Politics Maharashtra : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र, कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन सुरु केलं. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला. तासभराच्या बैठकीनंतर ‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी धाडल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असंही पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवार यांनी धरणं धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं.
शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली.