शरद पवार यांच्या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती निघणार?

‘लोक माझे सांगाती’ या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील मजकुराच्या सत्यतेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रखर दाव्यामूळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जेष्ठ पत्रकार दिनेश गुणे पवार साहेबांकडून वेगळीच अपेक्षा व्यक्त केली आहे. गुणे आणि तमाम मराठी लोकांची अपेक्षा पूर्ण झाली तर पवारांकडे पहाण्याचा दृष्टीकोन एकदमच बदलू शकतो.

 

चरित्र आणि चारित्र्य!

 

आत्मचरित्र म्हणजे आपल्या पूर्वायुष्याकडे प्रांजळपणे पाहून केलेले प्रामाणिक कथन असते अशी साहित्यक्षेत्राची कल्पना आहे. आजकाल मात्र, आत्मचरित्राच्या नावाखाली स्वयंप्रतिमासंवर्धन किंवा अन्य कोणाचे कळत-नकळत प्रतिमाभंजन होत असल्याचे दिसू लागल्याने साहित्यातील हा प्रकार बदनाम होण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागला की काय अशी शंका बळावत चालली आहे. साहित्याचा कोणताही प्रकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक आविष्कार असल्याने व कोणासही साहित्यक्षेत्रात वावरण्याचे स्वातंत्र्य असल्याने स्वतः केलेले किंवा अन्य कोणाकडून लिहून घेतलेले कोणतेही साहित्य वाचकांपर्यंत जाण्यास कोणाचीच आडकाठी नसते. अन्य कोणाकडून लिहून घेतलेल्या साहित्याचेही दोन उपप्रकार असतात. पहिल्या उपप्रकारात, अन्य कोणाकडूनही लिहून घेतले तरी स्वतःच्या नावावर असे लेखन खपविले जाते व त्यात प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराची जबाबदारी अशी व्यक्ती घेते. दुसऱ्या उपप्रकारास केवळ शब्दांकन असे म्हटले जाते. यामध्ये एखाद्या व्यक्ती ऐवजी अन्य कोणाची लेखक म्हणून नोंद होत असते.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांचे राजकीय जीवन, त्यांची कारकिर्द, संघर्षाचे किंवा सुखाचे प्रसंग आदींबाबत सामान्य माणसास कमालीची उत्सुकता आहे. अशा नेत्याच्या भूतकाळात डोकावताना, वर्तमानकाळातील सरलेल्या प्रत्येक क्षणाचीही नोंद होत असते म्हणूनच शरद पवार यांनी स्वतःच्या नावाने प्रकाशित केलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रत्येक नव्या आवृत्तीसोबत नव्या घडामोडींचाही वेध त्यांनी घेतला आहे. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एका भल्या सकाळी राजभवनवर शपथविधी उरकून सरकार स्थापन केले. या अनपेक्षित राजकीय घडामोडीचा जनतेस काहीसा धक्का बसला होता. शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात या शपथविधीची दखल नोंदविली आहे. मात्र, त्यांना देखील त्याबाबत कोणतीच पूर्वकल्पना नसावी असे ती नोंद वाचताना वाचकांस वाटते. या बातमीमुळे धक्का बसला, असे पवार यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. आत्मचरित्र हे प्रांजळ आणि प्रामाणिक कथन असल्याची समजूत असल्याने पवार यांचे ते कथन सत्य असल्याची वाचकांची सहाजिक समजूत झाली व पहाटेचा शपथविधी हा फडणवीस यांच्या चेष्टेचा विषय झाला. पवार यांच्या पुस्तकातील नोंदीमुळे चेष्टेस पुष्टी मिळाली.

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटामुळे त्या शपथविधीच्या राजकारणास व त्यानंतरच्या राजकीय चर्चांना कलाटणीच मिळाली. “त्या शपथविधीबाबत खुद्द पवार यांची संमती होती, तो घडवून आणण्याची व्यूहनीतीही त्यांची होती व ठरल्याप्रमाणे तो पार पाडण्याची जबाबदारी आमची होती, मात्र पवार यांनी ऐनवेळी घुमजाव करून डबल गेम केला” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितल्याने पवार यांच्यावर आता पुस्तकातील त्या नोंदी पासूनही घुमजाव करावे लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘त्या बातमीमुळे धक्का बसला’ ही नोंद खरी नसून ‘आपणच ती योजना आखली होती’ अशी नवी नोंद करून पुस्तकाची सुधारित आवृत्ती पवार प्रसिद्ध करणार का, असा सवाल आता केला जात आहे.

मात्र, नव्या आवृत्तीची ही त्यांनी घाई करू नये, कारण, आपल्या पोतडीत आणखीही काही मसाला आहे, असा सूचक इशारा फडणवीस यांनी दिला आहे. जसजसा तो बाहेर निघेल तसतशा पुस्तकातील नोंदी दुरुस्त करण्यापेक्षा, एकदमच सर्व सुधारणा करून आत्मचरित्रात्मक पुस्तकातील कथनास प्रांजळ व प्रामाणिकपणाचा मुलामा द्यावा म्हणजे साहित्य विश्वावरील विश्वास वाढीस लागेल. राजकारणातील हिशेबापायी साहित्य विश्व गढूळ होऊ नये, ही वाचकांची अपेक्षा असते. त्यात गैर काही नाही.