मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावरून घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीमध्ये तीव्र मतभेद समोर आले होते. काँग्रेसने शरद पवार यांचे मत वैयक्तिक असल्याचे सांगत त्यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली. त्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरुनही उध्दव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांचे कान टोचले होते. आता त्यांनी उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे.
मागील काही दिवसांपासून शरद पवार हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. अदानी प्रकरण असो वा इतर मुद्द्यांवरून पवारांचे मत हे विरोधी पक्षांशी जुळत नसल्याचे समोर आले. त्यात आता महाविकास आघाडीतील झालेल्या मतभेदांवर शरद पवारांनी उघडपणे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी चर्चा न करता राजीनामा दिला असं विधान शरद पवारांनी केले आहे.
शरद पवार म्हणाले की, मविआ सरकार तीन पक्षांची संख्या एक करून तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यात कुणी जर राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेणे याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता येत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.