शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मे महिन्यात त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर तीन दिवसांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. दरम्यान, बुधवारी छगन भुजबळ यांनी या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी हा राजीनामा देणं हे काही थेट झालेलं नव्हतं. १५ दिवस आधीच हा विषय झाला होता अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांनी राजीनामा दिला होता, तो त्यांना द्यायचाच नव्हता. परंतु, या सगळ्यांचा आग्रह होता की आपण भाजपाबरोबर जायचं, या आग्रहामुळे शरद पवार दुखावले गेले होते. ते दुखावले गेल्यानेच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांची राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ते नाट्य वाटत असेल पण आमच्यासाठी ते वास्तव होतं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर महाराष्ट्राची जनता, माध्यमं, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षातील सहकारी या सगळ्यांनी शरद पवारांना विनंती केली. सगळे पवारांना म्हणाले, तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्याचवेळी छगन भुजबळ म्हणाले, कमिटी वगैरे काही चालणार नाही, तुम्हालाच ही जबाबदारी घयावी लागेल. भुजबळांनी शरद पवारांना आग्रह केला तुम्हीच अध्यक्षपदी राहीलं पाहिजे.

खासदार सुळे म्हणाल्या, इथे मला छगन भुजबळांमधला आणखी एक विरोधाभास दिसतो. एकीकडे ते म्हणतात की शरद पवारांनी आम्हाला वाट दाखवली, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात शरद पवार भाजपाशी चर्चा करत होते, तर कधी म्हणतात, शरद पवार हुकूमशाहसारखे वागायचे, पक्षावर वर्चस्व गाजवत होते. परंतु, ते हुकूमशाहसारखे वागत असते तर पक्षाच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी त्यांनी समितीची स्थापना केलीच नसती.