मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. शरद पवारांनी पुढील निर्णय घेण्यासाठी समिती निवडली होती. त्या समितीनं पुढील निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी अध्यक्षपदावर राहावं, असं सांगत राजीनामा फेटाळण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यासंदर्भात प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मांडला. या प्रस्तावाला मंजुरी देत निवड समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला. शरद पवार हे अध्यक्षपदी हवेत, असा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी मांडला. या प्रस्तावाला निवड समितीनं मंजुरी देण्यात आली आहे.
प्रफुल पटेल यांनी मांडलेल्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच्या सदस्यांनी पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर केला. आता पुढच्या निर्णयाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, एकनाथ खडसे, फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोनिया दूहन हे बैठकीला उपस्थित होते.