शरद पवारांचा शब्दच्छल

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात फूट पडली आहे हे स्पष्ट दिसत असताना त्यांनी स्वतः ‘ आपल्या पक्षात फूट पडली नसल्याचा दावा करणे’ म्हणजे केवळ शब्दच्छल आहे, असेच म्हणावे लागेल. क्षणभर असे मानूया की, पवारांचे वक्तव्य बरोबर आहे. मग त्यातून प्रश्न निर्माण होतो की, त्यांची जर भाजपासोबत जाण्याची तयारी नाही, जिचा ते वारंवार उच्चार करतात आणि तरीही अजितदादांसहीत चाळीसेक आमदार भाजपासोबत जातात, काही लोक मंत्रिपदेही स्वीकारतात , तेव्हा त्या प्रकाराला काय म्हणायचे? स्वतः पवारानीच पक्षांतरबंदी कायद्याचा संदर्भ देऊन ही बाब स्पष्ट केली पाहिजे.

त्यांना कदाचित वाटत असेल की, आपण असे वक्तव्य करून  गोंधळ निर्माण करण्यात यशस्वी होऊ पण प्रत्यक्षात असे घडत आहे की, त्यांच्या मविआमधील काॅग्रेस व उबाठा या मित्र पक्षानाही त्यांचा हा युक्तिवाद पटत नाही व त्यानी तशी जाहीर वक्तव्येही केली आहेत आणि करीतही आहेत. विरोधी पक्षांच्या इंडिया या कथित आघाडीने  आपल्याशी संबंधविच्छेद करावा, याची तर ते प्रतीक्षा करीत नाहीत ना, असा प्रश्न अपरिहार्यपणे उपस्थित होतो. तसे जर झाले तर ‘ मी आघाडी सोडली नाही, त्यानीच मला बाजूला केले’ असे म्हणायला मोकळे राहण्याचा त्यांचा इरादा दिसतो.

शरद पवार हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत, हे आता सर्वच मान्य करतात. त्यांची विश्वसनीयता एवढी घसरली आहे की,’ ते जे बोलतात, त्याच्या अगदी विरूध्द कृती करतात ‘ यावर सर्वांचा विश्वास बसत आहे. कात्रजच्या घाटाच्या राजकारणाचे तर ते स्पेशॅलिस्टच बनले आहेत. हे सगळे ते कशासाठी करीत आहेत हेच कळेनासे झाले आहे.

आमच्या पक्षात फूट पडली  नाही, असे म्हणूनच ते थांबत नाहीत तर अजित पवार हे आजही आमच्या  पक्षाचे नेते आहेत असे स्वतः म्हणतात व  इतरांच्या मुखातूनही सूचित करतात. 2019 मधील अजित पवारांच्या  पहाटेच्या शपथविधीचे ते आता तीन वर्षानंतर ‘ ती आपलीच गुगली होती ‘ असे म्हणून तिचे पितृत्व स्वीकारू  शकतात तर आणखी काही दिवसानी ही फूटही आपलीच गुगली होती, असे म्हणायला ते मोकळे राहू शकतात असा निष्कर्ष कुणी काढला तर तोही ते मान्य करणार आहेत काय, हा प्रश्नही त्यांच्या शब्दच्छलातून निर्माण झाला आहे. मग अजितदादा गटाने आपला फोटो वापरू नये, असा इशारा कां देतात, हाही एक प्रश्नच आहे.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर