शरद पवारांचं ट्विट, अमित शाहांना केलं टॅग; म्हणाले, हा वाईट प्रकार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावरुन राजकीय वादळ अजूही शमलेलं नसतांना आज शरद पवार यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून देशातील एका विचित्र परिस्थितीवर भाष्य केले आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटमध्ये टॅग करत आपलं स्पष्ट मत मांडलं.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी जो आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्याला दिल्लीतील कॉलेजच्या विद्यार्थींनींनी पाठिंबा दर्शवण्यासाठी एक रॅली काढली होती. त्या रॅलीला दडपण्यासाठी पोलिसांनी त्या विद्यार्थींनींशी केलेले वर्तन हे अतिशय चुकीचे आहे. असे प्रकार खूपच वेदनादायी आणि वाईट आहेत. शांतपणे आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध. मी वैयक्तिकरित्या गृहमंत्र्यांना आवाहन करतो की, आता त्यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून काल रात्री उशीरा दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले. त्यात महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ केल्याचा आरोपही या खेळाडूंनी केला. दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पण आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अटकेची मागणी करत आहेत. या आंदोलनात काँग्रेसने उडी घेतली असून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होतेच. त्यात आता राष्ट्रवादीकडून खुद्द शरद पवारांनी याबाबत ट्वीट करत घडामोडींचा निषेध व्यक्त केला आहे.