– नागेश दाचेवार
गेल्या पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट सातत्याने बोलली जात आली आहे. ती म्हणजे पवारांचा काही नेम नाही आणि पवार काय करतील याचाही नेम नाही… राजकारणातील अस्थिरतेचे दुसरे नाव म्हणजे Sharad Pawar शरद पवार असे बोलले जाते. आजवर राज्यातील राजकीय पक्ष असो किंवा मग अवघे राजकारण असो; सारं शरद पवारांच्या भवती फिरायचे. देशातील, राज्यातील राजकारणाला स्थिर किंवा अस्थिर करणार्या शरद पवारांचेच राजकारण आता शेवटच्या काळात त्यांच्याच पुतण्याने अस्थिर करून ठेवल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पवारांचा काही नेम नाही… हे वाक्य शरद पवारांपुरतेच मर्यादित नसल्याचे आता अजित पवार आपल्या वर्तनातून सिद्ध करून दाखवत आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या एकूण हालचाली पाहता ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. तसा हा ज्वालामुखी कधीपासून खदखदत आहे, याचा अंदाज बांधणे क ठीण असले, तरी त्याचा विस्फोट कधीही होऊ शकतो, याची चाहूल मात्र लागलेली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखल्यापासून, पार्थ पवारांना निवडणुकीत पाडल्यापासून की शरद पवारांचा पुढील राजकीय वारस कोण? यातून ही धुसफूस आहे, हे सांगणे कठीण आहे. मात्र, धुसफूस ही शंभर टक्के पवार कुटुंबातील अंतर्गत कलहाचीच म्हणावी लागेल. ही दोन-तीन कारणं तर उघड उघड दिसणारी आहेत. पण पक्ष संघटनेत किंवा राज्य चालवताना अजून किती हक्क मारले गेले आणि मुस्कटदाबी झाली अजित पवारांची, हे तर त्यांचे तेच जाणोत! तसे अजितदादांच्या नावाला ‘टग्या’ हे ब्रीद लावले जाते. दादानेही सारं काही निमूटपणे सहन केलं अशातला भाग नाही. शरद पवारांना आपणही पवारच असल्याची आठवण ते वेळोवेळी करून देत आले आहेत आणि पवारांचा काही नेम नसतो, याची जाणीवही ते करून देत आले आहेत. आताही ते परत एकदा जाणीव करून देतच आहेत.
यावेळी दोन पवारांचा राजकीय सामना बघायला मिळत आहे. अजित पवार आपली खेळी खेळत आहेत तर Sharad Pawar शरद पवार आपल्या तिरकस चाली चालताना दिसत आहेत. अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोपवून धरण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दादांबाबत घेतलेल्या भूमिकेमागचे बोलविते धनी दुसरे-तिसरे कोणी नसून दस्तूरखुद्द शरद पवारच असल्याच्या चर्चेला सध्या ऊत आला आहे. हा शरद पवारांच्या तिरकस चालीचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे व संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेटले. तेथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चौघांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी या चर्चेचा हवाला देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा दावा केला. आपल्या कुटुंबावर पक्ष सोडण्यासाठी दबाव येत आहे. मात्र, तसा निर्णय कोणी घेतला तर तो त्यांचा वैयक्तिक असेल. पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत सांगितल्याचे संजय राऊत यांनी आपल्या लेखात लिहिले. माध्यमांसमोरही त्याचे समर्थन केले. मात्र, बंद दाराआड झालेली ही चर्चा सार्वजनिक झाल्यानंतरही त्यावर शरद पवारांनी आक्षेप घेतला नाही; उलट मौन पाळले. मात्र, अजित पवारांनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले. काही लोकं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्ये करू लागले आहेत. त्यांनी आपल्या पक्षाचे आणि मुखपत्राचे बघावे. आमच्यात लुडबूड करू नये, आमचे वकीलपत्र कोणी घेण्याची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात राऊतांना फटकारले. पण शरद पवारांची फूस होती म्हणून की काय… आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. आपण फक्त शरद पवारांचे ऐकतो. अजित पवार मला सांगू शकत नाही, अशा शब्दात राऊतही अजित पवारांवर उसळले. तसे राजकारणात अजित पवारांचे जे कद, उंची आणि ताकद आहे, त्याच्याशी बरोबरी करण्याची दूरदूरपर्यंत संजय राऊतांची पोहोच नाही आणि राऊतांची ही लायकी अजित पवारांनी ‘कोण संजय राऊत…?’ या एका वाक्यातून दाखवून दिली. बरं, अजित पवारांपाठोपाठ अशोक चव्हाणांनीदेखील राऊतांना काँग्रेसचे प्रवक्ते होण्याची गरज नाही म्हणत पुन्हा लायकी काढली. यावरून महाविकास आघाडीत सातत्याने लुडबूड करणार्या संजय राऊतांची परिस्थिती आघाडीत आता फुटबॉलप्रमाणे झाली आहे. जो म्हणाल तो, वाटेल तसे राऊतांना लाथाडताना दिसत आहे.
बरं, एकीकडे या घडामोडी होत असतानाच अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच दिलीप वळसे पाटील दाखल झाले. त्यापाठोपाठ सुनील तटकरे तेथे पोहोचले. भुजबळ तसेच वळसे पाटील हे Sharad Pawar शरद पवारांचे नजीकचे सहकारी मानले जातात. त्याचवेळी तटकरे हे अजितदादांचे जवळचे समजले जातात. या नेत्यांकडून साधारणतः दीड ते दोन तास अजित पवार यांची समजूत काढण्याचे काम चालू होते. आता हे नेते स्वत:हून तर तेथे गेले नसतील ना… शिवाय पक्षाचे विधानसभेतील प्रतोद नितीन पवार हे सिल्व्हर ओक येथून चर्चा करून थेट अजितदादांच्या बंगल्यावर पोहोचले आणि बराच काळ ते अजित पवारांच्या बंगल्यावर उपस्थित होते. म्हणजे शरद पवार अजित पवारांचे बंड थोपविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, हे यातून स्पष्ट होते. शेवटी काय, शरद पवार हे बोलतात ते कधी करत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. त्याचप्रमाणे अजित पवारही शेवटी त्यांच्याच मुशीत तयार झालेले, नावाने पवारच असलेले राजकीय खिलाडीच आहेत. थोरल्या तर थोरल्या, पण धाकल्या पवारांचा तरी कुठे काय नेम आहे… यावेळी आता कोणते पवार काय करतील… पवारांचा काही नेम नाही! त्यामुळे ‘तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे…’
– 9270333886