नवी दिल्ली : दिवसेंदिवस नवनवीन शिखर गाठणाऱ्या शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पहायला मिळाली. सोमवारी शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकींग झाली. सेन्सेक्स 616 अंकांनी घसरून 73,502 वर आला. निफ्टीही 160 अंकांनी घसरला आणि 22,332 वर बंद झाला. ऑटो, आयटी एफएमसीजी, मेटल, मीडिया, एनर्जी इन्फ्रा, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही नफा बुकिंग झाली.
शेअर बाजारातील घसरणीमुळे बाजार भांडवलात घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकसह सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 389.60 लाख कोटी रुपयांवर आले आहे जे मागील सत्रात 392.75 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 3.15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स वधारले तर 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 30 शेअर्स घसरणीसह बंद झाले. शेअर बाजार दिवसभर घसरणीसह व्यवहार करत होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स घसरले तर पाच कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले आहेत.