Share Market Updates : शेअर बाजारात तेजी; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?

Share Market Updates मुंबई : येत्या काळात तूफान तेजीच्या भारतीय बाजारात आज पुन्हा एकदा नवी उसळी बघायला  मिळणार आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) प्रथमच 70000 च्या वर उघडला. तर निफ्टी (Nifty) 21200 च्या पलिकडे उघण्याचे संकेत गिफ्ट निफ्टी कडून मिळताय.

पुढील वर्षी अमेरिकेत व्याजदरात तीन वेळा कपात होण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत. व्याजदरातील कपातीच्या संकेतांमुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी बघायला मिळतेय. काल रात्री झालेल्या अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत सलग तिसऱ्यांदा व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय झाला. सोबतच यापुढे व्याजदरामध्ये वाढ होणार नाही उलट पुढील वर्षी व्याजदरात कपात करण्याचे वेळापत्रक ठरवण्यावरही चर्चा झाली. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजाराच्या उत्तरार्धात डाऊ जोन्स अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकाने 500 अंकांची उसळी घेतली.

इतिहासात प्रथमच डाऊ जोन्स ३37 हजाराच्या पलिकडे बंद झाला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आज भारतीय बाजरातही बघायला मिळणार आहे . गेल्या काही दिवसात शब्दशः घोडदौड करणारे सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या उसळीसह नवी उच्चांकी पातळी गाठली.

बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी वाढणार? 

इकडे भारतीय रिझर्व्ह बँके  ने ही 10 डिसेंबरला जाहीर केलेल्या आपल्या पतधोरण आढाव्यात पतधोरण सैल करण्यासंदर्भात स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. पण सध्याच्या पतधोरणाचा खाक्या बघता येत्या दोन महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात गव्हर्नर आणि पतधोरण समिती बाजाराला सुखद धक्का देतील अशी चर्चा भारतीय बाजारात रंगतेय. यापार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या काही दिवसात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल भारतीय बाजारात सुमारे 4 हजार कोटी रुपये ओतल्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीतून पुढे आलं आहे.

इंट्राडे ट्रेडर्सनी काय करावे? 

आज गुरुवार असल्याने  वायदा बाजारातील कंत्राटांची एक्स्पायरी  आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही कालच्या तुलनेत मोठ्या फरकाने उघडण्याचे संकेत सकाळीच मिळतायत. म्हणूनच वायदा बाजारात ऑपश्न ट्रेडिंग  करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगून आपला नफा सुरक्षित करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. बाजारात सोमवारपासूनच अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतून मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष होतं.

आज व्याजदर कपातीचे स्पष्ट संकेत मिळाल्यावर भारतीय बाजार  सर्वोच्च पातळीवर उघडतोय. एक्सपायरी खबरदारी घेऊन बाजारात इंट्राडे ट्रेडिंग  करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांची सध्याच्या तेजीत मोठा नफा बघायाला मिळाला आहे. त्यामुळे एप्रिल 2023 नंतर खरेदी केलेल्या शेअर्समधील नफा सुरक्षित राहील याची खबरदारी गुंतवणूकदारांनी घ्यावी. नविन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असंही बाजार तज्ज्ञांनी म्हटलंय.