थॅलेसेमियाच्या बालरूग्णासाठी ‘त्या’ ठरल्या देवदूत

जळगाव : थॅलेसेमिया रूग्ण व त्याच्या कुटुंबियांना अनेक अडचणी येत असतात. त्यात बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा विषय असला की अधिकच समस्या. मात्र याच त्रासातील एका रूग्णाला शहरातील कोसला फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. सई नेमाडे यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी या बाल रूग्णास सर्जरीसाठी ५० हजाराची मदत देऊन आपल्या दातृत्वाचा परिचय दिला आहे.

थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार असून संपूर्ण कुटुंबाला होरपळून काढतो या रुग्णांना दर पंधरा ते वीस दिवसांनी रक्त संक्रमण करावे लागते. दुसरी उपचार पद्धती म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी त्यासाठी अंदाजे खर्च १५ ते २० लाख असतो. पेशंटचे त्याच्या बहिण- भावंडांसोबत किंवा आई-वडिलांबरोबर १०० टक्के एच. एल. ए. मॅच असेल तर शासनाकडून संपूर्ण खर्च मिळतो. परंतु ट्रान्सप्लांट नंतर रुग्णाला दर आठवड्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते त्यामुळे हॉस्पिटलच्या आसपास घर घेऊन कमीत कमी सहा महिने तरी राहावे लागते. त्यामुळे पालकांवर प्रचंड आर्थिक भार असतो. परत हे ऑपरेशन यशस्वी होणार का याची शाश्वती नसते. अशा संभ्रमित अवस्थेत मानसिक व आर्थिक पाठिंबा कोसला फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. सई नेमाडे नेहमीच करीत असतात. अशाच एका बाळाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी वेल्लोर हॉस्पिटल येथे पन्नास हजार रुपयांची आर्थिक सहाय्य करून मदतीचा हात पुढे करत आपल्यातील दातृत्वाचा परिचय देत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

तपासणी गरजेची थॅलेसिमिया हा अनुवंशिक रक्ताचा आजार आहे. आपल्या माता- पित्याकडून अपत्त्यामध्ये येतो. जर विवाहपूर्वी तरुण-तरुणीने हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरसीस ही रक्तातील तपासणी करून घेतली तर या आजाराला संपूर्णतः आळा घालता येईल. आज निरोगी आणि सुखदायी वैवाहिक जीवन जगण्यासाठी जन्म कुंडली जुळवण्यासोबत रक्ताची कुंडली जुळवण्याची गरज आहे.