सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विकत घेण्याची शिंदे गटाची तयारी, राऊतांचे वादग्रस्त विधान

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू असलेली सुनावणी गुरुवारी संपली. दोन्ही गटांच्या वकिलांनी राज्यघटनेतील तरतुदी व जुन्या निकालांचे दाखले देत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटाचे युक्तिवाद संपल्यानंतर घटनापीठाने निर्णय राखून ठेवला. या प्रकरणाचा निकाल काय लागेल? याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. आता निकालाबाबतील ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे आम्ही हा निकालसुद्धा विकत घेऊ का, याची मुख्यमंत्र्यांकडून तयारी सुरु असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद आता सर्वोच्च टोकाला पोहोचला असून दोन्ही गटाचे प्रवक्ते एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच राऊत यांच्या एका विधानामुळे वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांना चिंता आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागणार. मुख्यमंत्र्यांना चिंता वाटतेय की, निवडणूक आयोगाप्रमाणे आम्ही हा निकालसुद्धा विकत घेऊ का, त्याची त्यांची संपूर्ण तयारी सुरूय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु असतांना राऊतांने असे विधान म्हणजे, न्यायपालिकेचा अपमान असल्याचा संताप शिंदे गटाने केला आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागावाटपाच्या विधानावरुनही राऊत यांनी शिंदेंवर जोरदार प्रहार केला. हीच त्यांची लायकीय, भाजपने त्यांच्याकडे तुकडे फेकले, हे सगळे मिंधे लोकं फेकलेल्या तुकड्यांवर जगणार आहेत. भाजपवाले उद्या त्यांना केवळ ५ जागाच देतील, असे राऊत यांनी म्हटले.