१ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; वाचा काय आहे प्रकरण

अहमदनगर : देशातील दुसर्‍या क्रमांकावरील सर्वात मोठे मंदिर असलेल्या शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी आपण येण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. या मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र तुम्ही १ नंतर दर्शनाचे नियोजन करणार असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे. कारण १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.

शिर्डी मंदिरला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

यावर कोर्टाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवलीय. मात्र शिर्डीतील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नुकतेच शिर्डीतील नागरिकांनी हनुमान मंदिराजवळ भिकमांगो आंदोलन केले. दरम्यान, शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार, १ मे रोजी संपूर्ण शिर्डी गाव बंद ठेऊन संध्याकाळी ६ वाजता ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

नागरिकांनी सीआयएसएफ नियुक्तीला विरोध केला आहे. त्यासाठी १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डी ग्रामस्थ आता १ मे पासून बंद पाळणार आहेत. शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. शिर्डी बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे.