Shirish More : जीवन संपवण्यापुर्वी महाराजांनी लिहून ठेवली होती चिठ्ठी, उलगडले कारण

पुणे : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आज बुधवारी देहू येथे राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह त्यांच्या अनुयायांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी अचानक टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पण आता त्यांच्या या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.

शिरीष महाराज मोरे यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, येत्या २० फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी लिहून ठेवलेल्या चार चिठ्ठ्या सापडल्या असून, त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.

चिठ्ठ्यांमध्ये काय लिहलयं?

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी आई-वडील, बहीण, होणारी पत्नी, कुटुंब आणि मित्रांसाठी चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे की, माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे. माझ्यावर ३२ लाख रुपयांचे कर्ज आहे. मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता माझ्यात लढण्याची ताकत उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. त्यातील ७ लाख माझी कार विकून फिटतील, उरलेले २५ लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या.” महाराजांनी आपल्या होणाऱ्या पत्नीचीही माफी मागितली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.” तसेच त्यांनी आपल्या मित्रांना कुटुंबाची जबाबदारी घेण्याची विनंती केली आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील सर्व बाबींची चौकशी करण्यात येत आहे.

शिरीष महाराज मोरे यांच्या अचानक जाण्याने भक्तगण, कुटुंबीय आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येमागील आर्थिक विवंचना पाहता समाजातील आर्थिक व्यवस्थेतील अडचणींवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.