Shirpur : विकसित भारतासाठी मूलभूत संशोधन गरजेचे : प्रा. डॉ. विकास गीते

xr:d:DAFe8DR0y38:2528,j:4561444538181505381,t:24040611

Shirpur :  श्रीमती एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात २ एप्रिल २०२४  रोजी “विद्यापीठिय व महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यासाठी बौद्धिक मालमत्ता अधिकार” या विषयावर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्ष (IQAC) अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी संसाधन व्यक्ती म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बौद्धिक मालमत्ता अधिकार सेल चे समन्वयक प्रा. डॉ. विकास गीते उपस्थित होते.

 

प्रा. डॉ. विकास गीते या कार्यशाळेला संबोधित करताना म्हणाले की, संशोधनाची नेमकी गरज काय आहे ? पेटंट कसे फाईल करावेत ? ते पुढे म्हणाले, जगातील क्रमवारीत संशोधनांमध्ये भारताचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच संशोधन केवळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातच होत नसून ते मानव्य विद्याशाखा व आंतर विद्याशाखा या क्षेत्रात देखील होत असते. शेती संबंधीची अवजारे व त्यांना आधुनिक काळानुसार गावपातळीवरून नवनिर्मितीची होत असलेली उदाहरणे समोर येत आहेत.

एखाद्याची कल्पनाशक्ती, त्या कल्पनेचे वास्तव प्रारूप व त्या प्रारूपाचा संशोधनात्मक आणि उपयोजनात्मक विकास करता येणे ही आजच्या विद्यार्थ्यांसाठी काळाची गरज आहे. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा प्रतिभाशक्ती व नवनिर्मिती क्षमता अधिक प्रमाणात आढळून येते. मात्र काही संसाधनांचा तथा आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे संशोधनाला चालना मिळणे कठीण होते. त्यांनी विविध देशांतील संशोधनाचा तुलनात्मक अभ्यास मांडताना भारताला खूप मोठी संशोधनातील संधी असल्याचे विधान करून यासाठी उच्च शिक्षणाच्या सुरुवातीच्या वर्षापासूनच अशा क्रियाशीलतेला वाव मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

 

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शितोळे अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, संस्थेकडून महाविद्यालयाला उपक्रमशील बनविण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळते, महाविद्यालयातील संशोधन कार्य त्यामुळेच नियमितपणे सुरू असते. तसेच त्यांनी याप्रसंगी महाविद्यालयात चालणाऱ्या विविध योजना उपक्रम तसेच संशोधनात्मक कार्यक्रमांची माहिती दिली.

 

प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन पाटील यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट साध्य करताना प्राध्यापक व विद्यार्थी यांना नव संशोधनासाठी दिशा प्राप्त व्हावी व त्यावर सखोल चर्चा व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

या कार्यशाळेसाठी शिरपूर येथील आर.सी.पटेल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आर.सी.पटेल आयएमआरडी महाविद्यालय, एस.पी.डी.एम. महाविद्यालय, आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालय, एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालय, आर.सी.पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय तसेच बामखेडा येथील महाविद्यालय, एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय शिंदखेडा, सिसोदे महाविद्यालय नरडाणा येथील ९२ प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे तसेच या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. राहुल सनेर, तसेच सदस्य डॉ. अतुल खोसे, डॉ. विनय पवार यांनी प्राचार्य डॉ. शारदा शितोळे  व उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळेचे आयोजन केले.

 

सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विद्या पाटील यांनी तर आभार अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे तसेच या कार्यशाळेचे समन्वयक डॉ.  राहुल सनेर यांनी मानले.