धुळे । अद्यापपर्यंत शिरपूर तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नाही. रात्रीही वातावरणात उष्णता असल्यामुळे उकाड्याचा त्रास कायम आहे. दिवसाही उकाडा जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून ढग दाटून येत असल्यामुळे दिवाळीनंतरच शिरपूरवासीयांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून वातावरणात बदल होत असल्यामुळे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंवर परिणाम होत आहे. यंदाही पावसाचे आगमन जूनमध्येच झाले असले तरी पावसाचे प्रमाण मात्र असमतोल होते. त्यानंतर मात्र सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडीसाठी पोषक वातावरण सध्या तरी निर्माण होताना दिसून येत नाही.
दिवसा कडक ऊन, रात्री उकाडा
सध्या दिवसा कडक ऊन तापत आहे, तर रात्रीच्या वेळी प्रचंड उकाडा कायम आहे. यामुळे नागरिकांना गुलाबी थंडीची प्रतीक्षाच आहे, घराघरात पंखे, कुलर लागले आहेत. अद्यापही जिल्ह्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सायंकाळदरम्यान ढंग दाटून येत आहेत. काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रविवारी काही काळ वातावरणात गारवा जाणवला. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीसाठी पोषक वातावरण सध्या तरी निर्माण झाले नसल्याचे दिसते. वातावरण बदलामुळे थंडीचे आगमन उशिराच होणार असल्याचे बोलले जात आहे.
थंडीची प्रतीक्षाच !
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये थंडीची चाहूल लागते, परंतु यावेळी मात्र अद्यापही थंडी जाणवत नसून, वातावरणातील बदलामुळे तालुकावासीयांना थंडीची प्रतीक्षाच असून, दिवाळीनंतरच थंडी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
शिरपूर तालुक्यात पावसाची सरासरी ६४६ मिमी असताना तालुक्यात १५६ टक्के इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस बोराडी मंडळात तर सर्वात कमी होळनांथे मंडळात झाला आहे. परतीच्या पावसामुळे काही भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंडळनिहाय एकूण पावसाची आकडेवारी
शिरपूर – १०१२ मिमी, थाळनेर ८८७ मिमी, होळनांथे – ७६५ मिमी, अर्थे – ९७६ मिमी, जवखेडा- ७७९ मिमी, बोराडी – १०४५ मिमी, सांगवी – ९७९ मिमी