पाचोऱ्यात शिवजयंती उत्साहात साजरी; आमदार किशोर पाटलांची विशेष उपस्थिती

पाचोरा (विजय बाविस्कर)  : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध सांस्कृतिक व शालेय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर आप्पा पाटील उपस्थित होते.

शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना अर्पण केली. लेझीम पथक, जिवंत आरास, शिवरायांच्या वेशभूषेत विद्यार्थी, स्केटिंग मावळे, आणि भव्य रॅलीच्या माध्यमातून शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर केले तसेच ओजस्वी भाषणे सादर करत शिवचरित्राचे महत्त्व अधोरेखित केले.

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट वेशभूषा, पोवाडे व भाषण स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आणि युवकांनी त्यांचे ध्येय व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

ढोल-ताशांच्या गजरात शहर भगवामय

शिवजयंतीनिमित्त पाचोरा शहरात मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या झेंड्यांनी सजलेल्या वातावरणात संपूर्ण शहर शिवमय झाले होते. मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शिवप्रेमी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

या भव्य सोहळ्याला आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याने पाचोरा शहरात शिवजयंतीचा उत्साह द्विगुणीत झाला असून, शिवरायांचे विचार आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.