डॉ. पंकज पाटील/ राहूल शिरसाळे
जळगाव,
ना उन्हाची, ना थंडीची पर्वा, ना भूकेची चिंता, आता बस्स कथारूपी भोलेबाबच्या भक्तीत रममाण होण्याची लागलेली आस. मिळेल त्या जागेवर बसलेले स्त्री -पुरूष भाविकगण, रस्त्यारस्त्यावर वाहतूक सुरळीत करणारे पोलीस, होमगार्ड व सेवेकरींचा जथ्था, सात ते आठ किमी पायी चालत येत असलेले भाविक, डोक्यावर पोटाची शिदोरी, कंबरेवर तान्हुले, कपाळावर त्रिशुलाचा लावलेला गंध, असे सारे चित्र आज कानळदा रस्त्यापासून तर थेट कथास्थळी दिसून येत होते. निमित्त होते ते बडे जटाधारी महादेव मंदिर संस्थानातर्फे आयोजीत पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याचे.
शिवमहापुराणकार पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीतून शिव कथा श्रवण करण्यासाठी कथेच्या दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी उपस्थिती दिली.
बुधवार, 6 डिसेंबर कथेचा दुसरा दिवस. आज सकाळी आठ वाजेपासूनच भाविकांनी एस.टी. बस, रिक्ष्ाा, कार, दुचाकी या वाहनांनी तर काहींनी तर थेट पायीच कथा स्थळ गाठत मोक्याची जागा सांभाळली.
मृतांचे फोटोही ऐकतात कथा
कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या अनेक भाविकांनी आपल्या घरातील मृत व्यक्तींचे फोटाही सोबत आणले होते. काहींनी हे फोटो मंडपाच्या खांबांना बांधले होते. तर काहींनी बसल्या जागीच व्यवस्थितरित्या ठेवून जणू काही ते सदस्य बसून ही कथा श्रवण करत आहेत असे ठेवून कथा श्रवणाचा लाभ स्वत:सह मृत आप्तजणांनाही करून दिला.
याबाबत या भाविकांना विचारले असता मृत व्यक्तींच्या फोटो मंडपात ठेवून कथा श्रवण केली तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळते व त्यांना पुढील जन्मातील आयुष्य सुखात जाते. तर आपल्यालाही त्याचे पूण्य मिळत असल्याचे सांगीतले.
नको चटई, नको खुर्ची, गड्या आपली धरणीमाताच बरी
कथा श्रवणासाठी जळगाव जिल्ह्यासह धुळे,नंदुरबार, नाशिक, मालेगाव, बऱ्हाणपूर यासारख्या विविध जिल्ह्यातून भाविक आलेले आहेत. मुख्य व आजुबाजूच्या मंडपात जेथे जागा मिळेल तेथे भाविक बसले आहेत. लाखोच्या संख्येत भाविक येत असल्याने मंडपात बसण्यास जागाच शिल्लक राहीली नाही. त्यामुळे अनेकांनी मंडपाच्या बाहेरच कथेचा आवाज ऐकू येईल अशा ठिकाणी जागा सांभाळून बसले आहेत. डोक्यावर तापणारा सुर्य, येणारे जाणारे, ओबडधोबड शेत जमीन यांची पर्वा न करता भाविक बसले होते. उन्हाचे चटके बसू लागताच रूमाल, साडीचा पदर धरून सावली केली होती. तर काहींनी छत्री आणली होती. चांगली जागा सांभाळून चादर टाकून त्यावर कुटूंब छत्रीच्या सावलीत बसून कथा श्रवण करताना दिसत होते.
तर यापैकी काहीच नसल्याने उन्हातच बसलेले वयोवृध्द जोडपेही दिसत होते.
ना. गिरीश महाजन वैद्यकीय सेवा
कथास्थळी ना. गिरिश महाजन वैद्यकीय सेवेचे स्टॉल लावण्यात आलेले आहे. या माध्यमातून भाविकांची विनामूल्य तपासणी करून होमिओपॅथीची औषधे देण्यात येत आहेत.
तीन तात्पुरते बस थांबे
भाविकांची होणारी गर्दी लक्ष्ाात घेता एस.टी.ने जळगाव शहरातील मुख्य बस स्थानकासह वडनगरी फाट्याजवळील पेट्रोल पंप व कथास्थळापासून काही अंतरावर दुसरे असे तीन तात्पुरते बस स्थानक सुरु केले आहेत. या तीनही ठिकाणी पुरेशा बसेस कर्मचाऱ्यांसह भाविकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवलेल्या आहेत.
जागोजागी पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त
शहरातील टॉवर चौकापासून तर थेट कथास्थाळापर्यंत पोलीस व वाहतुक पोलीस व होमगार्ड वाहतुक सुरळीत करण्यासाठी तैनात केलेले होते. येणाऱ्या वाहनांना व भाविकांना योग्य मार्गदर्शन करत कथास्थळापर्यत सोडत होते. यातूनही काही दुचाकीस्वार, चारचाकीचालक मध्ये कोठूनही घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पोलीस कर्मचारी व्यवस्थित समजावत व्यवस्थेची माहिती देत होते. मात्र काही दुचाकीस्वार त्यांच्याशी अरेरावी करताना दिसत होते.
नृत्यात तल्लीन
कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या कथेच्या प्रारंभीच भक्तीमय वातावरण तयार होण्यासाठी विविध भजने व्यासपीठावरून सादर करण्यात येत होती. त्या गीतांवर मंडपातील स्त्री-पुरूष भाविक उभे राहून जागेवरच फेर धरून नाचत शिवभक्तीत तल्लीन होत आपल्या मनातील इच्छा व्यक्त करताना दिसत होते.
सर्व काही शिस्तीत
लाखो भाविकांचा जनसमुदाय असला तरी त्यात एक स्वयंघोषीत शिस्त बघावयास मिळाली. रस्त्याने येता जातांना, मंडपातही सेवेकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार भाविक कथेचा आनंद शिस्तीत घेत होते.
क्लिक क्लिक आणि क्लिक
न भूतो न भविष्यती अशी ही कथा होत असल्याने या कथेच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून भाविक जागेवरच उभे राहत आपल्या समूहाचे फोटो काढत होते. तर सोशल मीडियाच्या डीपीवर फोटो ठेवण्यासाठी सेल्फी फोटो, व्हिडीओही काढत होते.
पोलीसदादांनाही मोह आवरेना
बंदोबस्ताच्या निमित्ताने का होईना पोलीस कर्मचाऱ्यांनी हा सारा डोळ्यांचे पारणे फेडणारे शिव भक्तीचा महासागर आपल्या मोबाईलमध्ये कव्हर केला.