पालघर : शिवसेना नेते अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता असून, त्यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत. याप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी यास ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. तथापि, पोलिसांच्या ताब्यातून अविनाश फरार झाला आहे. तसेच, अशोक धोडी आणि त्यांच्या गाडीचा शोध अद्याप लागलेला नाही.
जमीन व संपत्तीच्या वादातून अपहरणाचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक धोडी यांच्या अपहरणाचे कारण जमीन आणि संपत्तीच्या वादात शोधले जात आहे. पोलीसांच्या तपासात अशोक धोडी आणि त्यांच्या ब्रिझा गाडीच्या स्थानाचा पत्ता अद्याप लागलेला नाही. यावरून, हे प्रकरण घातपाताच्या दृष्टीने पाहिले जात आहे. पालघर पोलिसांनी सहा वेगवेगळ्या पथकांना आरोपींच्या शोधासाठी रवाना केले आहे, ज्यात डहाणू, वाणगाव, नागझरी, आणि दादरा नगर हवेली येथील परिसर समाविष्ट आहे.
हेही वाचा : बापरे ! दोन गेंड्यांसमोर माय-लेकी जिप्सीतून पडल्या खाली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल
संशयित भाऊच्या फरारीने पोलिसांवर दबाव
पालघर पोलिसांच्या तपास कार्यावर त्यांचा सख्खा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी याच्या फरारी झाल्यामुळे दबाव वाढला आहे. घोलवड पोलिसांच्या चौकातून संशयित आरोपीने पोलिसांच्या तावडीतून निसटल्याची घटना घडली आहे. या संदर्भात, अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा धाकटा भाऊ असून, दोन भावांमध्ये अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादामुळे तणाव आहे.
पूर्वी हल्ल्याचे आरोप
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धोडी आणि त्याचा साथीदार मनोज रजपूत यांनी याआधी दोन वेळा त्यांच्या वडिलांवर हल्ला केला होता. अशोक धोडी यांचा मुलगा याबद्दल बोलताना म्हणाला की, “पोलिसांच्या कारवाईवर आम्ही समाधानी आहोत.”
आज दुपारी पोलिसांचा मोठा खुलासा होण्याची शक्यता
पोलिसांनी या प्रकरणातील तपासाला गती दिली असून, आज दुपारी मोठ्या खुलास्याची शक्यता व्यक्त केली आहे. यावर पालघर पोलिसांनी अधिक माहिती दिली की, तपासाची दिशा जमिनीच्या वादात आणि संबंधित आरोपींमध्ये असलेल्या तणावात आहे. पालघर पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी प्रयत्नशील असून, या प्रकरणात लवकरच महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.