Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल १० जानेवारीला लागणार आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी ४ वाजेनंतर निकालातील ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवला असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य होतं
दरम्यान विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. त्यानंतर सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेतला जाणार आहे. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही करण्यात आली आहे.
निकालाआधी राहुल नार्वेकर – मुख्यमंत्री शिंदेंची गुप्त भेट
शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) अपात्रतेचा निर्णय यायला दोन दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्याचे या निर्णयाकडे लक्ष लागले असून विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) नेमका कोणाला धक्का देणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान निकालाआधी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची (Eknath Shinde) भेट घेतली. १० जानेवारीला शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय लागणार आहे.
या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आजारी असल्याचे सांगण्यात येत होतं. एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यामधील ही भेट नियोजित नव्हती. ही गुप्त भेट होती. मात्र माध्यमांना याबाबतची कुणकुण लागली. अचानक ही तातडीची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या सुनावणीची देखील तारीख समोर आली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.