शिवसेना दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात, काय होणार?

शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडणार आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार विधीमंडळात दाखल झाले आहेत.

शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडणार आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. सुनावणी पार पडत सर्व आमदारांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. तसेच, सेंट्रल हाॅलमध्ये सर्वांना मागील बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचिकेप्रमाणे त्या-त्या आमदारांना आणि त्यांच्या वकिलांनी पुढे बोलावून त्यांचं म्हणनं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या ज्या-ज्या आमदारांना नोटीस धाडण्यात आलेली ते सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थित आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांनी आजच निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.