Shiv Sena’s bomb-bomb movement to protest severe water shortage in Varangaon भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नगरपरीषद आवारात शिवसेनेतर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तातडीने उपाययोजना न झाल्यास शिवसेनेच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी समीर शेख, कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी यांना निवेदनातून देण्यात आला.
ऐन उन्हाळ्यात टंचाईने जनता हैराण
ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरात पंधरा ते वीस दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरीकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वरणगाव नगरपरीषदेवर प्रशासक राजवट असतानाही पिण्याच्या पाण्याची कुठलीही उपाययोजना होत नसल्याच्या व सुस्त प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी जोरदार बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच नागरीकांना 15 ते 20 दिवसांनी पाणी मिळते तर एप्रिल मे मध्ये नागरीकांचे काय हाल होतील? आतापासूनच प्रशासक/ मुख्याधिकारी यांनी यावर उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्यांक जिल्हा उपसंघटक शेख सईद, युवा सेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख सुनील भोई, शिवा भोई, शाखाप्रमुख संजीव कोळी, विकी मोरे, आबा सोनार, संजीव खराते, नंदू खराटे, राहुल इंगळे, इरफान शेख, उप शाखाप्रमूख योगेश सतावकर, प्रवीण वाकोळे, मुकेश चंदने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
25 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे काय?
वरणगाव शहरासाठी नवीन 25 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे परंतु या योजेनेच्या कामाला तीन वर्ष मुदत संपल्यानंतरही ही योजना पूर्ण झालेली नाही. अरीहंत कन्स्ट्रक्शन पुणे येथील या कंपनीने हे काम घेतले असून ते पूर्णपने निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम तीन फुट ऐवजी दोन फुटांवर टाकण्यात येत आहे. नेमका या निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराला प्रशासनाचा आशीर्वाद असल्यानेच हा संबंधित ठेकेदार निकृष्ट काम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विकास कॉलनी आणि प्रतिभा नगरमध्ये पाण्याची टाकी मंजूर नाही तरीदेखील या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येत आहे. पाण्याची टाकीच अजून मंजूर नाही तर मग पाईपलाईन कशासाठी? हा प्रश्न देखील सेनेने उपस्थित केला आहे. पाईप लाईन टाकायची आणि लगेच बिले सादर करून बिले काढण्याचे काम सध्या ठेकेदार जोरात करत असल्याचा आरोप देखील यावेळी शहरप्रमुख संतोष माळी यांनी केला.