---Advertisement---
नशिराबाद: नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी अँप वरून पीक नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यतः माहिती लोड करीत असताना अँप मधील चुकीच्या GPS मॅप मुळे शेतकरी पिक नोंदणीं करण्यापासून वंचित राहत आहेत. याबाबत शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नशिराबादचे माजी सरपंच पंकज श्यामकांत महाजन यांच्यासह निलेश रोटे, अँड. डी. एम. येवले ,सतीश कावडे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनाच्या सूचनांनुसार शेतकरी मोबाईल अँपद्वारे पीक पाहणी करत आहेत. परंतु, सध्याच्या हंगामात अँपमध्ये पिक पेरा नोंदवितांना नशिराबाद गावासह शेजारील तरसोद, मन्यारखेडा व इतर गावातील शेतकऱ्यांना शेती शिवाराचे नकाशे वरील संकेत स्थळावर व्यवस्थित अपलोड न झाल्याने व चुकीच्या पद्धतीने अपलोड झाले असल्याने, नाना त-हेच्या अडचणी निर्माण होत आहेत.
प्रसंगी शेतकऱ्यांचे पीक पेरे या तांत्रीक अडथळ्यामुळे नोंदविली जाऊ शकत नाही. नकाशा निवडल्यावर संबंधीत क्षेत्राची जागा व इतर शिवारनकाशे योग्यरीत्या अपलोड न झाल्यामुळे शेतकरी शेतात उभा राहून फोटो घेत असतानाही नकाशा २ ते ३ किलोमीटर अंतरावर दाखवतो. त्यामुळे खरी जमीन निवडता येत नसल्याने ई-पिक पाहणी अडकली आहे.
नशिराबाद गावात सुमारे ५६०० हेक्टर क्षेत्रावर २५०७ शेतकरी शेती करतात. त्यांचे पीक ई-पिक पाहणी अँप वर नोंदवले गेले नाही तर शेतकरी हमीभाव, नैसर्गिक आपत्ती मदत आणि इतर शासकीय योजनांपासून वंचित राहतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भुमी अभिलेख विभागाने अपलोड केलेले नकाशे चुकीचे असल्याने हे संकट ओढवले आहे. त्यामुळे संबंधित विभागाशी संपर्क करून अँप दुरुस्त करावे, अन्यथा तलाठ्यांमार्फत हाताने पीक पाहणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाची तातडीची दखल..
जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाची अतिशय महत्त्वाची बाब म्हणून तातडीने तहसीलदार सूर्यवंशी यांच्या स्वाधीन केली. तहसीलदारांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितले की, “१४ सप्टेंबरपर्यंत तांत्रिक बाब दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, जर तोपर्यंत समस्या सुटली नाही तर १५ सप्टेंबरपासून कृषी सहाय्यकांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर थेट लेखी पीक नोंदणी केली जाईल.” त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन तहसीलदार सूर्यवंशी यांनी केले आहे.