नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी काँग्रेसमधील सर्व पदांवरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. अनिल के. अँटोनी हे बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीबाबत केलेल्या आपल्या ट्विटनंतर काँग्रेसमध्येच घेरले गेले होते. त्यानंतर अनिल के अँटोनी यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
अनिल अंटोनी यांनी ट्विट करून सांगितले की, माझ्यावर एक ट्विट डिलीट करण्यासाठी असहिष्णूपणे दबाव आणला जात होता. फ्रीडम ऑफ स्पिचच्या बाता मारणारेच माझ्यावर दबाव आणत होते. मी ट्विट डिलीट करण्यास नकार दिला. दरम्यान अनिल अँटोनी यांनी राजीनाम्याचं पत्रही ट्विट केलं आहे. दरम्यान, आपल्या राजीनामापत्रामध्ये शशी थरूर यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत.