दूध संघ : एकनाथ खडसे यांना धक्का; आमदार मंगेश चव्हाण विजयी

तरुण भारत लाईव्ह | ११ डिसेंबर २०२२ | जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत हायहोल्टेज लढत म्हणून भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्याकडे पाहिले गेले. अंत्यत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली. मंदाताई खडसे यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव झाल्याने एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.

दूध संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलची धुरा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांभाळली. खडसे व चव्हाण यांच्याकडून एकमेकांवर राजकीय चिखलफेक केली जात असल्याने सुरुवातीपासून ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती.

जिल्हा दुध संघावर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रशासक मंडळाची नियुक्ती करत आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मुख्य प्रशासकपदाची धुरा देण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात खडसे गट न्यायालयात गेले. तेथे या निर्णयाला स्थगिती मिळाली. दुध संघाची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आपण खडसे कुटुंबातील सदस्याच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली.

यानंतर त्यांनी थेट मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. स्वत: मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. मतमोजणी सुरु असतांना दोघांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली. शेवटी अवघ्या ४ मतांनी चव्हाण यांनी बाजी मारली.