मुंबई : राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यापैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, इतर शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान अशात आता एका जिल्ह्यात देखील तब्बल 87 खासगी इंग्रजी शाळा बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे समोर आले आहेत. याबाबत एका वाहिनीने वृत्त दिले आहे.
कोणत्या जिल्ह्यात?
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या शाळांची व्यवस्थापन आपली दुकाने थाटून बसले असल्याचे एका वाहिनीने वृत्त दिले आहेत.
दरम्यान शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात शाळांच्या संस्थाचालकांना पत्र पाठविले होते. त्यानंतर जिल्ह्यात सीबीएसई, आयसीएसईची मंडळाची मान्यता प्रस्तावित असल्याच्या एकूण 87 शाळा शहरात असल्याचे शिक्षण विभागाला आढळून आले होते. पुढे शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत यापैकी 18 शाळांकडे एनओसी, तर 17 शाळांकडे मान्यताच नाही, तसेच उर्वरित 52 शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत.
मात्र असे असताना देखील नवीन शैक्षणिक वर्षासाठी या शाळांमध्ये भरमसाट शुल्क घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. धक्कादायक म्हणजे उघडपणे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून अद्याप एकही मोठी कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बोगस शाळा कशी ओळखणार!
पालकांनी मुलांचे ऍडमिशन करताना शाळेकडे संबंधित बोर्ड आणि शासन मान्यतेची चौकशी करावी.
तसेच संबंधित शाळेकडे शासनाने दिलेला मान्यता आदेश क्रमांक तपासून घ्यावा.
शाळांनी सर्व माहिती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात लावली आहे का? हे पालकांनी तपासून घ्यावे.
मुलांचे ऍडमिशन करताना संबंधित शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयात शाळेची चौकशी करून घ्यावी.