Shocking: भारतात 1 वर्षात Cancer मुळे 9.3 लाख लोकांचा मृत्यू

Cancer : जगभरात कॅन्सर  Cancer हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात या आजारामुळे लाखो लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात गेल्या एक वर्षात कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेल्या 9.3 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. संशोधकांना असे आढळून आले की, कॅन्सरच्या वाढत्या घटना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत चीन आशियामध्ये आघाडीवर आहे.
चीनमध्ये कॅन्सरचे सर्वाधिक 48 लाख नवीन रुग्ण आढळून आले आणि 27 लाख लोकांचा मृत्यू झाला. जपानमध्ये कॅन्सरची जवळपास 9 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 4.4 लाख मृत्यू झाले. संशोधकांच्या मते, 2019 मध्ये आशियामध्ये कॅन्सर हा सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका बनला होता
मागील वर्षी याची 94 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली. ज्यात 56 लाख लोकांचा मृत्यू झाला.
संशोधकांनी असं सांगितलं आहे की, ‘आम्ही 1990 ते 2019 दरम्यान आशियातील 49 देशांमध्ये 29 प्रकारच्या कॅन्सरच्या नमुन्यांचे परीक्षण केले.’ संशोधकांच्या मते, आशियातील कॅन्सर श्वासनलिका आणि फुफ्फुसांमध्ये (TBL) सर्वात जास्त आढळतो. अंदाजे 13 लाख प्रकरणे नोंदवली गेली आणि 12 लाख लोकांचा मृत्यू झाला. या अवयवांच्या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे पुरुषांमध्ये आढळून आली.

संशोधकांनी नोंदवले की, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण, विशेषत: महिलांमध्ये, अनेक आशियाई देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणि पहिल्या पाचमध्ये आहे. 2006 मध्ये सादर करण्यात आलेली मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) लस, रोग रोखण्यासाठी आणि HPV-संबंधित मृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी सिद्ध झाली आहे.

कॅन्सरसाठी जबाबदार असलेल्या 34 घटकांपैकी धूम्रपान, मद्यपान आणि प्रदूषक हे प्रमुख घटक असल्याचे आढळून आले. अभ्यासात म्हटले आहे की, ‘आशियातील वातावरणातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक आहे.’ संशोधकांच्या मते, भारता, बांगलादेश आणि नेपाळसारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये खैनी, गुटखा, पान मसाला या तंबाखूचे सेवन हा चिंतेचा विषय आहे.