तरुण भारत लाईव्ह । २४ ऑगस्ट २०२३। मुलाचं भलं व्हावं, धनलाभ व्हावा, यासाठी जन्मदात्या आईने पोटच्या २० वर्षीय मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मुलीला जाळल्यास धनलाभ होईल असे सांगितल्यानंतर आईने हे भयावह कृत्य केले. मुलगी झोपेत असताना तिच्या अंथरुणावर पेट्रोल टाकुन तिला जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांचं बारा वर्षांपूर्वी निधन झालं असून आता ती तिच्या आई आणि भावासोबत फुलेनगर येथे राहत होती. तुझ्या मुलाचं भलं करायचा असेल आणि तुला धनलाभ करून घ्यायचा असेल, तर तुला तुझ्या मुलीला जिवंत मारून टाकावे लागेल, असं शकुंतलाने पार्वतीला सांगितलं. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी रात्री मुलगी घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या कुलीमध्ये एकटी झोपलेली होती. तिची आई आणि भाऊ खालच्या मजल्यावर झोपलेले होते.
यावेळी १७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास तिची आई वरच्या मजल्यावर आली आणि मुलीच्या अंथरुणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केली. त्यानंतर ती खाली आली. आईने पेट्रोल ओतून पेटवताच मुलीला जाग आली, तिने पटकन अंगावरील गोधडी फेकून दिली आणि आरडाओरड करत खाली आली. यावेळी तिची आई खालीच होती मात्र तिने कुठलीच मदत केली नाही. तर ज्या भावासाठी आईने हे सारं केलं, त्याच भावाने स्वत:च्या अंगावरील गोधडीने बहिणीच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणामुळे मुलगी घाबरून गेली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरवले मात्र तिच्या आईने पोलिसांना तक्रार करू नकोस असे सांगितले. दरम्यान मुलीची आई बाहेर गेली असता आईची नजर चुकवून मुलीने सिडको पोलीस ठाणे गाठून आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला यावेळी पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करुन तिच्या फिर्यादीवरून आई पार्वती आणि शकुंतला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.