तरुण भारत लाईव्ह । २६ ऑगस्ट २०२३। तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मदुराई स्टेशनवर यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून २० हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेने प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लखनऊहुन ही ट्रेन रामेश्वरमला निघाली होती. सकाळी पाच वाजता ही ट्रेन मदुराई स्टेशनवर थांबली होती. त्यावेळी गाडीला आग लागली आहे. हि बातमी सगळीकडे पोहोचली. यानंतर तिथे अग्निशामक दल आणि पोलिसांना बोलवण्यात आलं. तोपर्यंत १० प्रवाशांचा मृत्यू झाला तर २० जण गंभीर जखमी झालेत. हि आग इतकी भयानक होती कि संपूर्ण डब्ब्याला आगीने वेढले होते. आग लागल्याचे पाहून इतर प्रवासी प्रचंड घाबरून गेले. अग्निशमन दलाचे जवान आग वीजवण्याचे काम करत आहेत. रेल्वे पोलीस आणि इतर पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, ज्या डब्ब्याला आग लागली तो डब्बा एक खासगी डब्बा होता. नागरकोईल जंकशन येथे शुक्रवारी हा जोडण्यात आला होता. त्यात काही प्रवासी अवैधरित्या सिलेंडर घेऊन निघाले होते. त्यांच्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरमुळे आग लागली असल्याच अधिकार्यानी जाहीर केलं. एकच डब्बा जळाला असून इतर डब्बे सुरक्षित आहेत असंही अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.