भुसावळ : शहरातील खान्देश करीयर अॅकेडमी या स्पर्धा परीक्षा केंद्रातच ज्ञानार्जन करणार्या शिक्षकाने शहरातील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी पीडीतेने त्रास असह्य झाल्याने शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी अभिषेक पाल (32, पंचमुखी मंदिराजवळ, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी त्यास शहर पोलिसांनी अटक केली.
मोबाईलमध्ये काढले तरुणीचे फोटो
भुसावळ शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात खान्देश करीयर अॅकेडमी स्पर्धा परीक्षा केंद्र असून तेथे अभिषेक पाल हा शिक्षक आहे. 1 जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान पाल याने शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय तरुणीचा क्लासमध्ये तसेच फिल्टर हाऊस भागात तसेच ग्राऊंडवर रनिंगचा सराव करताना विनयभंग केल्याचा आरोप आहे. या शिवाय संशयित पाल याने विद्यार्थिनीच्या नकळत तिचे फोटो मोबाईलमध्ये काढले तसेच अश्लील इशारे करीत तरुणीस कॉफि पिण्यासाठी गळ घातत तरुणीचा विनयभंग केला. पीडीतेने हा त्रास असह्य झाल्यानंतर शुक्रवारी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर रात्री उशिरा संशयित अभिषेक पाल या शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार मोहम्मद सैय्यद करीत आहेत.